नंदुरबार : राज्यात अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांनी सभा, बैठका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यात आता शिवसेनाही (शिंदे गट) कंबर कसली असून, जिल्ह्यातून दोन आमदार निवडणूक आणणार, असा विश्वास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
डाब (ता. अक्कलकुवा) येथे आयोजित ‘शिवदूत संमेलना’त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते विजयसिंग पराडके, किरसिंग वसावे, धडगाव पं.स. उपसभापती भाईदास अत्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
अक्कलकुवा-धडगाव मतदार संघाची जागा कोण लढणार ?
दरम्यान, अक्कलकुवा-धडगाव मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांचे सुपूत्र शंकर पाडवी यांना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
यावर बोलताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शंकर पाडवी यांच्या ऐवजी विजयसिंग पराडके वा किरसिंग वसावे या दोघांमध्ये उमेदवार निच्छित केला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली. याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत उद्या बैठक होणार आहे, असे श्री. रघुवंशी म्हणाले.
तसेच विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांची ‘सुपूत्र आमदार व्हावा’, अशी इच्छा आहे. परंतु, विजयसिंग पराडके आणि किरसिंग वसावे हे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्याही इच्छा असू शकतात. आमदार आमश्या पाडवी यांना आम्ही सर्व मिळून समजवू, ते ऐकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.