अक्कलपाडाच्या उजव्या कालव्याला गळती; कापूस पिकाचे नुकसान, नुकसान भरपाईची मागणी

धुळे : अक्कलपाडा धरणातून उजव्याकालव्यात पाणी गेल्या काही दिवसांपासून सोडण्यात आले आहे. कालव्यातून पाणी झिरपत आहे. यामुळे कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या ८० एकर क्षेत्रातील शेतीतील कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी उजव्या जव्या कालव्यालगत चिंचखेडा, भदाणे, देऊर, लोणखेडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली.

अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्याची लांबी धरणापासून साधारणतः २० किलोमीटर अंतरापर्यंत आहे. कालव्यातून हरणमाळ तलाव भरण्यासाठी पाणी सोडले आहे. कालव्यामध्ये पाण वनस्पती व गवताचे प्रमाण वाढले आहे. त्याची साफसफाई होणे गरजेचे आहे.

कालव्याला लागलेल्या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ते पाणी पांझरा नदीत जाते. उजव्या कालव्यालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना जास्त त्रास होत आहे. या गळतीमुळे शेतात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. दररोज हजारो लिटर पाणी या पाणंद रस्त्यातून पांझरा नदीपात्रात जाते.

शेतकऱ्यांना चिखलातून पायी चालावे लागते शेतमजूर शेतात कामासाठी यायला कंटाळा करतात. या गळतीमुळे शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे नुकसान होत आहे. या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे नुकसान होत आहे.

उजव्या कालव्यालगत असलेल्या दहा एकर कापसाच्या शेतात कालव्यातून पाणी झिरपून साचले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करावा व आर्थिक भरपाई द्यावी. अन्यथा उजव्या कालव्यातून झिरपत असलेले पाणी बंद करावे.
-आबा कौतिक शेवाळे, शेतकरी, देऊर

उजव्या कालव्याच्या पाण्याच्या झिरप्यामुळे चार महिन्याचे पीक वाया गेले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे. तसेच नुकसान भरपाई संबंधित विभागाने द्यावी. कारण शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरपाई द्यावी. अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी उपोषण करतील.
-अर्जुन झिपा शेवाळे, शेतकरी देऊर, ता. धुळे