जळगाव : चाळीसगावच्या गणेशपूर परिसरातील १४ वर्षीय बालकाला ठार करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता, अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने वनविभागाला यश आले असल्याची माहिती उपवन संरक्षक प्रवीण ए. यांनी दिली.
चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी वन्यप्राणी बिबटने अनिल नंदू मोरे या १४ वर्षीय मुलास हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. तसेच आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये जनजागृती व हल्ले टाळण्यासाठी उपाययोजना संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. बिबटच्या हल्ल्यातील मृत मुलाच्या वारसदार आई, वडिलांना शासन निर्देशानुसार वनविभाग अधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी तात्काळ धनादेशाद्वारे १० लाख रु. नुकसानभरपाई देण्यात आली.
यानंतर वनविभाग जळगाव उपवनसंरक्षक प्रवीण ए . यांच्या मार्गदर्शन, अध्यक्षेतेखाली वन्यप्राणी बिबटच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. सर्व उपाययोजना करूनही वन्यप्राणी बिबट नैसर्गिक अधिवासात परतत नसल्याने या बिबट्यास जेरबंद करणें, बेशुद्ध करण्याची शिफारस गठीत समितीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार वन्यप्राणी बिबट यास जेरबंद करणे, बेशुद्ध करणे बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांचेकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर वनविभागाकडून आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.
गुरुवार, १९ रोजी सायंकाळी बेशुद्ध करणारे पथकप्रमुख मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, जळगाव यांनी गणेशपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी मेहुल राठोड यांच्या सल्ल्यानुसार वन्यप्राणी विबट यास बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. सरपंच, पोलीस पाटील व इतर गणेशपूर गावकरी यांच्या उपस्थितीत वन्यप्राणी बिबट यास जेरबंद केलेला पिंजरा पिकअप वाहनात नेण्यात आला.
जळगाव वनविभाग उपवनसंरक्षक प्रवीण ए. यांच्या नेतृत्वाखाली जळगाव वनविभाग सहाय्यक वनसंरक्षक अमोल पंडित, चाळीसगाव (प्रा.) वनपरिक्षेत्र अधिकारी, शितल नगराळे तसेच वन कर्मचारी अमन गुजर, वन्यजीव अभ्यासक यांनी ही मोलाची कामगिरी बजावली.