चाळीसगाव : शहराच्या विकासकामांसाठी तब्बल २० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, आता चाळीसगाव शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
शहरातील महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन या कामासाठी ६ कोटी, प्रभाग क्र.१ मधील शिवपार्वती नगर, रामकृष्ण नगर, माधव नगर, शिवाजी नगर येथील अंतर्गत रस्त्यांना एकूण ९ कोटी रुपये निधी, प्रभाग क्र.९ मधील हिरापूर रोड ते सुयश लॉन्स परिसरातील रस्त्यांना ५ कोटी निधी मंजूर झाला आहे.
काही महिन्यांपूर्वीच मंजूर झालेल्या दयानंद जवळील तितुर नदीवरील पूल तसेच कोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामाचे १६ कोटींचे टेंडर देखील प्रकाशित झाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहर वासीयांना दिवाळी भेटच दिली आहे.
लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने चाळीसगाव शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. चाळीसगाव शहरातील महत्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांचे आभार मानले आहेत. येणार्या काळात अजून भरीव निधी आणून शहरातील रस्ते चकाचक करण्याचा संकल्प केला आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.