अखेर फडणवीसांनी अबू आझमींना झापलं, काय आहे कारण?

मुंबई : काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आपण वंदे मातरम् म्हणणार नाही कारण, इस्लाममध्ये अल्लाह सोडून कोणालाही वंदन करता येत नाही असं विधान केले होते. यावर विधानभवनात मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांना समज दिली होती.

आज पुन्हा विधानसभेत हा मुद्दा गाजला. भाजपा खासदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात अबू आझमी यांच्यावर जोरदार टीका केली. चर्चेत अबू आझमींना गद्दार देखील म्हणण्यात आले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे शब्द विधानसभेच्या कामकाजातून वगळण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाचे समर्थन करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अबू आझमींची चांगलीच कानउघडणी केली. ते म्हणाले की, “अबू आझमींना गद्दार म्हणणं चुकीच आहे. तेही शिवाजी महाराजांना मानतात. पण अबू आझमींनी देखील लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रात शांती कायम ठेवायची असल्यास, जी लोक मुस्लिम तरुणांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. या राज्य सरकारच्या काळात कोणावरही जातीच्या आणि धर्माच्या आधारे भेदभाव होणार नाही. हे मी आपल्याला सांगतो”.