अखेर ‘या’ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळाला न्याय!

तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३ :  मुलींचा जन्मदराचा टक्का वाढावा, यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगानेच शासनाच्या जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाकडूनही मुलींचा जन्म दर वाढीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांना तब्बल तीन – चार वर्षांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचे प्रस्ताव चार वर्षांपासून या विभागात धुळखात पडून राहिले. या योजनेसाठी निधी असतानाही संबंधित विभागाने या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची तसदी घेतली नाही. त्याची कागदपत्रे, प्रस्ताव दडवून ठेवण्यात आले. यासंदर्भात माहिती समोर आल्यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव करीत यातील 62 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला होता. तर 43 लाभार्थी चार वर्षांनंतही प्रतिक्षेतच होते. मात्र 16 जानेवारी रोजी तरूण भारतच्या स्तंभलेखाची दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने उर्वरीत राहिलेल्या प्रस्तावित 43 लाभार्थ्यांना रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी संबंधित बँकेला ही रक्कम वर्ग करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे जि.प.चे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात 249 शाळांचे वीज कनेक्शन तोडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान


जिल्ह्यातील 249 शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने जि.प.शाळांची अडचण झाली आहे. त्यात डिजिटल शाळांचेही वीज कापण्यात आल्याने त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. जिल्ह्यातील जि.प.शाळाचे वीज बील स्थानिक ग्रामपंचायतींच्या निधीतून भरले जाते. परंतू बहुतांश ग्रामपंचायतींच्या वसूलीअभावी या शाळांची बीले भरली नाहीत. त्यामुळे वीज बील न भरल्याने महावितरणने जिल्ह्यातील 249 शाळांचे वीज कनेक्शन कापले. त्याबाबत जिल्हा परिषदेेचे सीईओ डॉ.पकंज आशिया यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी शाळांचे वीज कनेक्शन पूर्ववत करण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे लवकरच या शाळांचे वीज कनेक्शन सुरळीत होतील असे जि.प.च्या सीईओंनी सांगितले आहे. सध्या जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्तावाढीसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. दोन वर्षांच्या कोरोना महामारीमुळे निपुण चाचणीत जिल्ह्यात जि.प.शाळाच्यागुणवत्तेचा दर्जा खालावला होता. यासंदर्भात सीईओंनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून तात्पुरत्या शिक्षकाच्या नियुक्तीसह विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओ डॉ.पकंज आशिया प्रत्येक आठवड्याला शिक्षण विभागाची झाडाझडती घेत असतात.

पोषण आहारातीलमृत पालप्रकरणी कारवाईची प्रतिक्षाच!


जळगाव तालुक्यातील आसोदा येथील अंणगवाडीमार्फत गरोदर माता व त्यांच्या बालकांना देण्यात येणार्‍या पोषण आहाराच्या सील बंद पॅकेटमध्ये चना, मुगदालमध्ये मृत पाल आढळून आली होती. याप्रकरणी लाभार्थ्यांने अन्न व औषध प्रशासन व जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र अद्यापही यप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. याप्रकरणी संबंधित पुरवठादार यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येते. लाभार्थ्यांने तक्रार देऊनही व त्यासोबत समक्ष पुरवठा केलेल्या दाळीचा नमुना देऊनही तक्रारदाराच्या तक्रारीवर तातडीने अ‍ॅक्शन घेण्यात आले नाही.

चाळीसगाव पं.स.तील संशयास्पद एलईडी हायमास्ट खरेदीची चौकशी जि.प.सीईओंनी गुंडाळली


चाळीसगाव पंचायत समितीत अव्वाच्या सव्वा दराने हायमास्ट खरेदी करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यासंदर्भात जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर सीईओंनी यासंदर्भात चौकशी लावली होती. जिल्हा परिषदेच्या अभियांत्रिकी विभागातील मोरे यांच्याकडे ही चौकशी देण्यात आली होती. मात्र चौकशीच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओंनी ही चौकशी तपासणीविनाच गुंडाळल्याची चर्चा आहे. त्यामुळे चौकशी झाली तर त्यातून काय निष्पन्न झाले हे दडपून ठेवण्यात आले आहे. संबंधित तक्रारदारांना चौकशीबाबतचा खुलासा देण्यात आलेला नाही. परिणामी चाळीसगाव पंचायत समितीची हायमास्ट चौकशीवरच संशय निर्माण झाला आहे. निवेदेत 150 व्हॅटचा एलईडी खरेदी केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात 80 व्हॅटचा एलईडीचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच वायरचे दर, अ‍ॅल्यूमिनियम तारेचे दर दुप्पट व तिप्पट वाढवून बीले सादर करण्यात आली आहेत. सर्वच इलेक्ट्रीक साहित्याचे दरही वाढवून ठेकेदाराने बील सादर केले आहे. तसेच स्पेसीफिकेशन न करता टेंडर काढण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील दर आणि कंत्राटदाराने सादर केलेल्या दरात मोठी तफावत आहे. यात शासनाच्या निधीची अपव्यय झाल्याचे स्पष्ट असतानाही चौकशीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच संबंधित कंत्राटदाराची बीले काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शासानाने निर्धारीत केलेल्या सीएसआर दरापेक्षा जास्त टक्कयाने हे साहित्य खरेदी केल्यानंरतही संबंधित कंत्राटदार व अधिकार्‍यांवर कारवाई होणे दूरच राहिले. एलईडी हायमास्टची बीले मक्तेदारास चौकशी पुर्ण होण्यापूर्वीच अदा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सीईओंच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भविष्यात जि.प.च्या सेमी इंग्रजी शाळांना अच्छे दिन


जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात 1 हजार 821 शाळा असून त्यापैकी 470 शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जि.प.च्या शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिलीपासून सेमी इंग्रजी शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात जि.प.चे सकारात्मक पाऊल मानले जात आहे. त्यामुळे भविष्यात जि.प.च्या सेमी इंग्रजी शाळांना अच्छे दिन येणार आहेत. त्यामुळे जि.प.शाळेत शिक्षण घेणार्‍या पालकांसाठी भविष्यात जि.प.च्या निम्म्या शाळा सेमी इंग्रजी होणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक 63 सेमी इंग्रजीच्या जि.प.च्या शाळा एरंडोल तालुक्यात सुरू झाल्या आहेत. त्यांनतर पारोळा, अमळनेरचा क्रमांक लागतो. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी 40 सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढता कल लक्षात घेता जिल्हा परिषदेनेही सेमी इंग्रजी शाळांना मान्यता देण्यासाठी एक पाऊल पुढे येत अनुकूल भूमिका घेतली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या अवाजवी फीमुळे पालकवर्गांचा जि.प.च्या सेमी इंग्रजी शाळांकडे कल वाढला आहे. ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शाळा सुरू झाली. त्या शाळेच्या वर्गातील शिक्षकांना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा प्रकल्प जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गर्शनाखाली गुणवत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. त्यासाठी जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील सेमी इंग्रजी शाळांसाठी आग्रही भूमिका घेत आहेत. जि.प.च्या शिक्षण विभागाने सेमी शाळांसाठीची अनुकूलता कायम ठेवल्यास या शाळांची गुणवत्तेत मोठा परिवर्तन भविष्यात पाहायला मिळणार आहे. नैसर्गिक वाढीने भविष्यात इयत्ता पहिलीपासून वर्ग वाढत जाणार आहेत. त्यामुळे जि.प.च्या शाळांमधील वर्गांची नैसर्गिकरित्या सेमीकडे वाटचाल असेल असे शैक्षणिक क्षेत्रातील जाणकाराचे म्हणणे आहे.