कुऱ्हा काकोडा ता.मुक्ताईनगर : बापाला भेटू न दिल्यामुळे आत्महत्या केलेल्या सोमचा शनिवार, ३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वाघाची कातडी तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आई-वडील यांच्या उपस्थितीत दफन विधीचा सोपस्कार शांततेत पार पडला. यावेळी वनविभाग आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पट्टेदार वाघाची शिकार करून कातडीची तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी रहिम पवार याला शुक्रवार, २ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान हलखेडा येथे चौकशीसाठी आणले होते. यावेळी बापाला भेटू न दिल्यामुळे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या सोम रहिम पवार (१४) याने कोंबड्याच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तशी त्याने सुसाईट नोट देखील लिहून ठेवली होती. त्यानंतर पाड्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या मुश्किलीने मृतदेह शवविच्छेदनासाठी दुपारी तीन वाजता जाऊ दिला. त्यानंतर शवविच्छेदन झाले मात्र, आई वडिलांच्या उपस्थितीतच सोमचा दफन विधी करावा, अशी मागणी करण्यात आल्याने कायदेशीर बाबी पूर्ण करून दोन ताशाची अटीवर बेल दुसऱ्या दिवशी शनिवार, ३ रोजी झाली. सायंकाळी वनविभागाच्या ताफ्यासह सोमचे आई-वडील जळगाव येथून निघाले, रात्री आठ वाजेच्या सुमारास दफन विधीचा सोपस्कार पार पडला.
हलखेडे येथे झालेल्या दुर्दैवी दुर्घटने नंतर आरोपी रहिम पवार व तेवा बाई पवार यांना मुलाच्या अंत्यविधीस उपस्थित रहाता यावे, या करिता वन विभागाने कोर्टात आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडली असता, कोणतीही हरकत घेतली नाही,
तसेच आरोपीच्या तब्येतची सर्व सुरक्षा राखण्याकरिता डॉकटर पथक व अग्निशमन यंत्रणा तयार ठेवली, मुलगा सोम ह्याचा अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर व सर्व परिवार नातलग ह्यांची भेट झाल्या नंतर वन विभागाने आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन पथक जळगाव कडे रवाना झाले. या प्रसंगी जळगाव सहाय्यक वन सरंक्षक तथा चौकशी अधिकारी यु एम बिराजदार यांचे सोबत वडोदा वनक्षेत्र पाल परिमल साळुंके, मुक्ताई नगर , जळगाव , एरंडोल जामनेर सर्व वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते असे वनविभागाच्या कडून सांगण्यात आले.