मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदेंचे पद जाणार, राज्याचे नवे मुख्यमंत्री अजितदादा पवार, अश्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. मात्र, चर्चात आणखी भर पळते आहे. आता तर चक्क एका आमदाराने अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार याची तारीखच सांगितली आहे.
मागच्या आठवड्यात अजित पवार यांचा वाढदिवस होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एक टि्वट केलं. त्यांनी अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात लवकरच अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार अशी चर्चा सुरु झाली आहे. या सर्व चर्चांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी सांगितलं की, “महायुती आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढेल” मात्र, तरीही या चर्चा थांबण्याच नाव घेत नाहीयत.
आता विधान परिषदेतील काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची तारीख सांगितली आहे. ते म्हणाले की, “तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटणं चुकीच नाहीय. पण यावेळी शिंदेंसोबत त्यांचं कुटुंब होतं. पत्नी, सुना, वडिल, मुलगा सर्व होते. हा शिंदेंचा सेंडऑफ तर नाही ना? अशी विधिमंडळात चर्चा सुरु आहे” 10 किंवा 11 ऑगस्टपर्यंत स्पीकरला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, निर्णय घ्यायचा आहे. शिंदे यांना कदाचित सेंडऑफ दिला जाईल. अजित दादांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं अभिजीत वंजारी म्हणाले.