पुणे : नवीन संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रित न केल्याबद्दल विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. मात्र याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचं कौतुक केलं. त्यांनी सर्व खासदारांना एकत्र येऊन देशातील सर्वसामान्यांसाठी काम करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला.
अजित पवार म्हणाले, की इंग्रजांनी आपली संसद बांधली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता ज्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे, ते आपण स्वतः बांधलं आहे. जुन्या संसद भवनाच्या बांधकामासोबत देशातील सध्याच्या लोकसंख्येची तुलना करताना पवार म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकप्रतिनिधीही वाढणार असून या नवीन इमारतीची गरज असल्याचं त्यांना व्यक्तिश: वाटत होतं.
ते म्हणाले, देशाच्या लोकसंख्येचा विचार करता जुनी संसदेची इमारत बांधली गेली तेव्हा भारतात आपण ३५ कोटी लोक होतो आणि आता १३५ कोटी आहोत. हे पाहता आता लोकप्रतिनिधीही वाढणार आहेत. त्यामुळे या नव्या इमारतीची गरज होती असं मला व्यक्तिश: वाटतं. ही इमारत विक्रमी वेळेत बांधण्यात आली आहे. कोविडच्या काळातही बांधकाम सुरू होतं आणि अखेर आपल्याला एक छान संसद भवन मिळालं आहे.