अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा पलटवार, म्हणाले ‘खोटं बोलत आहेत’

Mahrashtra Politics : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, अजित पवार खोटं बोलत आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत आम्ही अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटलो. आत्ताच राजीनामा देऊ नका, असं ते म्हणाले होते. परंतु त्यांना माहिती होतं. ते आता खोटं बोलत आहेत. मी अध्यक्ष नव्हतो तर उपाध्यक्ष त्यांचा होता. त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती.

एक वर्ष नवीन अध्यक्ष करु शकले नाही, हा आमचा दोष आहे; असं त्यांनी मान्य केलं आहे. उपाध्यक्षांनी माझे अधिकार वापरायला पाहिजे होते. परंतु त्यांनी ते वापरले नाही. भाजप सत्तेसाठी काहीही करत आहे. संविधान संपवण्याचा विचार भाजपचा आहे. कालचा निर्णय असाच प्रकार होता. भाजपलाच नैतिकता असेल तर आता त्यांनी त्यांनी राजीनामे दिले पाहिजे होते, असंही शेवटी नाना पटोले म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?
आमचे त्यावेळचे (महाविकास आघाडी सरकारच्या काळातील) विधानसभा अध्यक्ष यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरच त्यांना सांगितलं. एकतर तो द्यायला नको होता. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्याक्षांची निवडणूक लावून तो विषय संपवला पाहिजे होता. मी कोणाला दोष देत नाहीये. पण दुर्दैवानं आमच्या सगळ्यांकडून, महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर विधानसभेचे अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. त्यानंतर बऱ्याच काळापर्यंत विधानसभा उपाध्यक्षच सभागृहाचें कामकाज बघत होते, त्यामुळं नेमकी ती (अध्यक्षपदाची) पोस्ट रिकामी राहिली होती. या घटना घडल्या की ताबडतोब त्यांनी (शिंदे गटाने) ती पोस्ट भरण्याचा प्रयत्न केला. बहुमत त्यांच्याकडं असल्याने त्यांनी ती पोस्ट भरली. जर ती पोस्ट आधीच भरली असती तर त्याच अध्यक्षांनी या १६ आमदारांना अपात्र ठरवलं असतं.