पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच त्यांना खुले आव्हानही दिले आहे. सोमवारी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मी जे योग्य वाटेल ती भुमिका घेण्याची मला मुभा आहे. त्यामुळे बाकीच्यांनी मला टोकायचं काम नाही. एका खासदाराने जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खुप बरं झालं असतं. एक खासदार एक दीड वर्षांपुर्वी माझ्याकडे येऊन मला राजीनामा द्यायचा आहे असे म्हणाले होते. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलेलं आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जिवाचं रान केलं आहे.”
“पण मधल्या काळात ते कोणत्याच मतदासंघात फिरत नव्हते. त्यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. मी काढलेला सिनेमा अजिबात चालला नाही. असे म्हणत त्यांनी मला आणि त्यावेळच्या वरिष्ठांना राजीनामा देतो असे सांगितले होते. परंतू, आता निवडणुका जवळ आल्याने त्यांना उत्साह आला आहे. त्यामुळे आता कुणाला संघर्ष यात्रा सुचत आहे तर कुणाला पदयात्रा सुचत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच “आम्ही जनाधार काय आहे हे बघुन उमेदवारी देतो पण निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. ते उत्तम वक्ते आहेत. त्यांचं वत्कृत्व चांगलं आहे. उत्तम कलाकार आहेत. संभाजी महाराजांची भुमिका त्यांनी उत्तम पद्धतीने बजावली. पण काळजी करु नका. त्यांच्याविरोधात तिथे दिलेला उमेदवार निवडून आणूनच दाखवेन,” असे आव्हानच अजित पवारांनी अमोल कोल्हेंचे नाव न घेता दिले आहे.