पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौऱ्यात बोलतांना अजित पवार यांचं कौतुक केलं यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझ अमित शहांनी कौतुक केलं, तुम्हाला का वाईट वाटतं. माझ्यावर कोणी टीका केली मला काही वाटत नाही. आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या विकासासाठी मी भाजपसोबत गेलो आहे. रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी मोठा निधी दिला आहे, “देशात मोदींशिवाय मला दुसरा पर्याय दिसत नाही, राज्यातील महत्वाची काम आम्हाला करायची आहेत. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं आहे. अमित शाह यांना पुणे, नाशिक रेल्वेच आम्ही सांगितलं. त्यांनी सर्व काम घेऊन दिल्लीला येण्याच निमंत्रण दिलं आहे, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, साखर कारखान्यांच्या बाबतीत २०, २२ वर्ष निर्णय होत नव्हते, तो निर्णय अमित शाह यांनी घेतला आहे. अमित शाह आणि आमची चर्चा वेगळीच झाली आहे, माध्यमात येणाऱ्या चर्चा चुकीच्या आहेत. आमच्यात विकास कामा संदर्भात चर्चा झाली आहे, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.