मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय धूमश्चक्रीत आता आणखी एक वळण आले आहे. अजित पवार आता नेमकी काय राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवार जी भूमिका घेणार ती आम्हाला शंभर टक्के मान्य आहे, अशी भूमिका आमदार अण्णा बनसोडे यांनी मांडली आहे. अजित पवार समर्थक आमदार मुंबईला निघाले आहेत. त्यांच्याशी भेटून जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे. त्यांचा मी कट्टर समर्थक आहे. ते जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
धनंजय मुंडे नॉट रिचेबल!
अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेही नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आपले दोन्हीही फोन बंद ठेवले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या समर्थकांना मुंबईला रवाना होण्याचे निर्देश दिले आहेत. धनंजय मुंडे बीडहून थेट मुंबईला रवाना झाले आहेत. अजित पवार कोणती भूमिका घेणार, ते वेगळा विचार करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुढचा संपूर्ण महिना पक्षप्रवेशाचा
पुढील संपूर्ण महिना हा पक्षप्रवेशाचा आहे. पक्षात कुणीही आले तरीही त्याला कुणाची ना नसते. ज्याला पक्षाची विचारधारा मान्य आहे, असा कुणीही व्यक्ती आमच्यासोबत येऊ शकतो, अशी प्रतिक्रीया दिल्ली दौऱ्यावर असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे.
अजितदादा आमच्यासोबत!
अजित पवार हे महाविकास आघाडीतील वज्रमुठ सभेत होते. त्यांच्याशी आम्ही सोबत होतो. आमच्याशी संवाद साधत होते. त्यांच्या बोलण्यावरुन ते मविआ सोडून जातील असे तूर्त वाटत नाही, अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांचं दादांना समर्थन
अजित पवार हे राष्ट्रवादीतील एक प्रमुख संपत्ती आहेत. त्यांच्याकडे आमदारांना सांभाळण्याचे कौशल्य आहे. ते खरे राष्ट्रवादीचे वारसदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही, असेही आमदार माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.