अट्रावल येथील जागृत मुंजोबा यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ

यावल । यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान यात्रोत्सवास आज १० फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. यंदा यात्रोत्सव १० ते २४ फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे. दरम्यान यावल व फैजपूर भुसावळ, जळगावसह इतर बसस्थानकावरून भाविकांसाठी विशेष सेवा पुरविली जाणार आहे

अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर या जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारसह पोर्णिमेला ही यात्रा भरते. माघ शुक्ल पक्षातील पहील्या तीथीलाच शनिवार आल्याने आजपासून यात्रा प्रारंभ होत आहे. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत.

असे आहेत यात्रेचे वार: अनेक वर्षाचा इतिहास असलेल्या या यात्रेची सुरुवात १० फेब्रुवारी शनिवारी होत आहे. हा पहिला वार असून, सोमवार (दि.१२) रोजी दुसरा, शनिवार (दि.१७) तिसरा तर सोमवार (दि.१९) चौधावार आणि शनिवार (दि.२४) माध पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा वार  राहणार आहे.

दरम्यान, येणाऱ्या अमावास्येपर्यंत मुंजोचा अग्नीडाग घेतात. मुंजोबाला लोणी, नारळ, फुलहार अर्पण केले जाते. हे संपूर्ण साहित्य मुंजोबाच्या मूळ प्रतिमेवर स्थानावर आहे त्या स्थितीत कायम असते. ते आपोआप पेट घेतात, त्याला मुंजोबांनी अग्नीडाग घेतल्याचे संबोधले जाते.