अडावदला ग्रामसभेत राडा, प्रोसिडींग बुक पळविण्याचा प्रयत्न

अडावद, ता.चोपडा : येथील ग्रामसभेतून प्रोसिडींग बुक पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार आज सोमवार, १२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. परंतु, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रापंचायत सदस्यांच्या समय सुचकतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. यामुळे ग्रामसभेत प्रचंड गोंधळ उडाला. यात प्रोसिडींग बुक फाटल्याने खळबळ उडाली. अचानक झालेल्या या घटनेची दिवसभर खमंगचर्चा रंगली होती. मात्र, हा प्रकार का घडला ? याचे कोडे उलगडले नाही.

येथील ग्रामपंचायतीने सोमवार, १२ रोजी  सकाळी १० वाजता पिक संरक्षक संस्थेच्या आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच रविंद्र चव्हाण हे होते. यात वनहक्क समिती गठीत करण्याचा विषय घेण्यात आला होता. परंतु यासाठी मतदार संख्येच्या एक द्वितीअंश लोकसंख्या ग्रामसभेस उपस्थित असणे बंधन कारक असल्याने कोरम अभावी ही सभा तहकुब करण्यात आली. सभा संपल्यानंतर वादाची ठिणगी पडली. आमच्या सह्या का घेतल्या ? असा सवाल उपस्थित करित काही आदिवासी महिलांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या ताब्यातील प्रोसिडींग बुक हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रोसिडींग बुकाची खेचाखेची झाली. अखेर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रोसिडींग बुक ग्रामपंचायतीच्या दप्तरी जमा केले. या धक्कादायक प्रकाराने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली असुन दिवसभर या प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरु होती. परंतु ग्रामपंचायतीचे प्रोसीडींग बुक पळविण्याचा प्रयत्न का झाला ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहीला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सपोनि प्रमोद वाघ यांनी ग्रामपंचायतीत जावून या घटनेचा आढावा घेतला. यावेळी ग्रामसभेस ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे, समन्वयक विजय पावरा, अल्ताफ पठाण, हरिष पाटील, सचिन महाजन, कालु मिस्तरी, संदिप महाजन, जुनेद खान, पंकज महाजन, अनिल देशमुख, जावेद खान, जयराम पावरा, जगीराम बारेला, मधुकर भिल, देवसिंग बारेला आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.