तरुण भारत लाईव्ह न्युज अडावद ता.चोपडा: येथील आठवडे बाजाराच्या परिसरात सुरु असलेल्या सुलभ शौचालयाचे बांधकाम करित असतांना 33 वर्षीय मजुराला मुख्य वाहिनीच्या वीज तारेचा धक्का बसल्याने बांधकाम करणार्या मजूराचा जागेवरच मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वीज मंडळावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडे बाजाराच्या परिसरात ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ठेकेदाराच्या सहाय्याने सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरु आहे. शौचालयाच्या वरुनच (उच्च लघुदाब) मेन विद्युत वाहिनी गेलेली आहे. अशातच 8 रोजी दोन जण या शौचालयाचे बांधकाम करित होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास रहेमान गफ्फार मन्यार (वय-33 रा.अमळगाव ता.अमळनेर) हल्ली मुक्काम अडावद ता.चोपडा या मजूराला विजेचा जबर धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंगावर विद्युत तार पडली की त्याचा विद्युत तारेला स्पर्श झाला. याबाबत मात्र विविध तर्क लावले जात आहे. पण विद्युत वाहिनीमुळे मजुराचा जीव गेला ह्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.