शिंदी : जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यात अनेकांना आपल्या जीवावर मुकावे लागत आहे. अशातच २१ फेब्रुवारी रोजी भडगाव ते वाकनजीक झालेल्या अपघातातील गंभीर जखमी शिंदी येथील पिता आणि पुत्राचा एक दिवसाच्या अंतराने मृत्यू ओढवला. संजय हरि वाघ (३२) व धीरज वाघ (६) अशी मृत बाप-लेकाची नावे आहेत.
२१ रोजी शिंदी येथील संजय हरि वाघ हे पत्नी शितल वाघ (२७) व सहा वर्षाचा मुलगा धीरज वाघ यांच्यासह दुचाकीने भडगाव येथे जात होते. त्याचवेळी वडजी येथील प्रताप मोतीलाल परदेशी (४७) हे भडगावहून गावाकडे परतत होते. भडगाव ते वाक दरम्यान एका वळणावर या दुचाकी एकमेकांवर आदळल्या. यात प्रताप परदेशी हे जागीच ठार झाले तर संजय वाघ आणि धीरज हे बाप-लेक जखमी झाले. त्यांना धुळे येथे नेण्यात आले. तर शितल यांच्यावर पाचोरा येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू झाले.
उपचार सुरु असतानाच शुक्रवारी पिता संजय वाघ याचा तर शनिवारी एकुलता मुलगा धिरज वाघ याचा मृत्यू झाला. गावी शोकाकूल वातावरणात एका दिवसाच्या अंतराने पिता-पुत्राची अंत्ययात्रा निघाल्या. संजय वाघ हे मजुरीकाम करीत उदरनिर्वाह चालवित होते. त्यांच्या पश्चात वृध्द आई-वडील आहेत. शितल यांची प्रकती स्थिर आहे.