Crime News : अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पीडीत मुलीचाही मृतदेह आढळून आला असून तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ही घटना आहे.
नाशिकच्या दिंडोरी पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबरला पिंपळनारे गावातील ३५ वर्षीय उमेश खांदवे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याने एका २० वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून ती मुलगी काही महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं आहे. दुसऱ्या दिवशी २८ सप्टेंबरला दिंडोरी पोलीस आरोपी उमेशला तपासकामी त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले असता तेथून परत येतांना नाशिकच्या गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने उमेश खांदवे पोलीस वाहनातून खाली उतरला आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन त्याने पळ काढला.
विशेष म्हणजे, फरार आरोपीचा शोध सुरु असतांनाच मुलीच्या घराजवळीलच एका विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. फरार आरोपी उमेश खांदवेचा शोध सुरु असतांनाच आरोपीच्या घराजवळ मी आत्महत्या करतो आहे; अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आरोपीचा शर्ट आणि चिट्टी पोलिसांना आढळून आल्याची गावात चर्चा आहे. एकूणच उमेश आत्महत्या करणार अशी चिट्टी सोडल्याने संपूर्ण गावात त्याची चर्चा सुरू झाली.
पिडीत मुलीला ही माहिती मिळाली आणि पीडित मुलीनेही घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पिडीत मुलींने उमेशच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे उमेश आत्महत्या करणार म्हणून मुलींने आत्महत्या केली का? की घरच्यांच्या दबावामुळे मुलींनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून त्यांच्या तपासाकडे सगळ्यांचच लक्ष लागलय.