नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक मंगळवार आणि बुधवारी नियोजित होती. अध्यक्षस्थानी खासदार अॅड. गोवाल पाडवी होते. मंगळवारी बैठकीत ३५ विभागांकडून केंद्र सरकारच्या निधीतून होणाऱ्या कामांची माहिती दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. खासदार पाडवी हे बैठकीतून निघून गेले. योग्य ती माहिती मिळाल्यानंतर बैठक घेण्याच्या सूचना खासदार गोवाल पाडवी यांनी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना दिल्या.
दिशा समितीच्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजना आणि निधी यासंदर्भात या समितीमध्ये ३५ विभागांचा आढावा घेतला जातो. जिल्ह्यात समितीची बैठक घेण्याबाबत खासदार पाडवी यांनी ऑगस्ट महिन्यात प्रशासनाला पत्र दिले होते. यानुसार जिल्हा प्रशासनाने मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवस बैठकीचे आयोजन केले होते.
दरम्यान मंगळवारच्या बैठकीत विभागांच्या कामकाजाची माहिती न देण्यात आल्याने खासदार अॅड. गोवाल पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली. माहिती मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी बैठक तहकूब केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी माहिती अद्ययावत का, दिली जात नाही, असा प्रश्न विचारून अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
बैठकीत प्रशासनातील ३५ विभागांचा आढावा घेण्यात येणार होता. मात्र, फक्त १३ विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. २२ विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहितीची पूर्तता केली नव्हती. यामुळे कोणती कामे झाली किंवा कसे याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले होते. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अपूर्ण माहितीनंतर समितीच्या सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली.
नव्याने बैठक घेण्याचा निर्णय
दिशा समितीची बैठक तहकूब झाल्यानंतर त्याच सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीसाठी अधिकाऱ्यांनी योग्य नमुन्यात माहिती भरून उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या, अधिकाऱ्यांनी या बैठकीला येताना परिपूर्ण माहिती सोबत आणावी. येत्या ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी ही बैठक नव्याने होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.