अनिलदादा आता करा…विकासाचा ‘एकच वादा’…!

तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । या महिन्याचा प्रारंभ राजकीय क्षेत्रासाठी खळबळजनक ठरला. ‘काका, विश्रांती घ्या…’ म्हणून सांगणार्‍या अजितदादांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जबर धक्का बसला. प्रारंभी ३५ ते ४० आमदारांसह अजितदादा बाहेर पडले. पूर्वी पहाटेच्या शपथविधीचा धक्का व आता ‘संडे’ मूडमधील नागरिकांना दुपारनंतर टीव्हीपुढे बसावे लागले. राष्ट्रवादीतील एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ आमदारांना अजितदादांच्या बंडाचा लाभ झाला. नऊ जणांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचीही वर्णी लागली.

२ जुलै रोजी आमदार अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फारशी राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या अनिल पाटील यांचे वडील भाईदास पाटील हे  सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. आई पुष्पाबाईना शेतीची आवड.  अनिल पाटील यांचे शिक्षण सिम्बॉयसिस विद्यापीठात  एमबीए आणि एलएलबीपर्यंत झाले. सर्वप्रथम २००२ ला कळमसरे डांगरी गटात व नंतर २००७ साली अमळगाव  पातोंडा गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. त्यानंतर १० वर्षे बाजार समिती सभापती राहिले आहेत. तसेच १० वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते आणि आता पुन्हा जिल्हा बँकेवर आणि दूध संघावर निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील २०१३मध्ये नगराध्यक्ष झाल्या आणि नंतर २०१७ला जिल्हा परिषद सदस्य झाल्या. नंतर अनिल पाटील यांना २००९  व २०१४ ला भाजप कडून विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि दोन्ही वेळा त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ला राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली आणि अनिल पाटील विजयी झाले. अजित दादा समर्थक म्हणून पहिल्यांदा पहाटेच्या शपथविधीला ते अजित पवारांसोबत होतेच.

यावेळीही त्यांनी ‘एकच वादा’ कायम ठेवला. पक्षाने त्यांच्यावर प्रतोद म्हणून जबाबदारी दिली. विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक आंदोलनात त्यांनी मुख्य जबाबदारी पार पाडली. मंत्रीमंडळात त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन या महत्वाच्या विभागाची जबाबदारी आली आहे. आता जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज तथा पर्यटन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता आणि आता नव्याने अनिल पाटील यांच्याकडे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन हा महत्वाचा विभाग आला आहे. जळगाव जिल्ह्याच्या ‘विकासाचे पुनर्वसन’ करण्यात आता त्यांचाही आतभार लागणार आहे. गिरीशभाऊंनी मेडिकल कॉलेजसह महापालिका कर्जमुक्तीचे मोलाचे काम केले. गुलाबरावांनी अनेक पाणीपुरवठा योजनांना मदत केली. यासह विविधांगी विकास कामांना हातभार लावला आहे. आता जळगाव जिल्ह्यातील जनतेला अपेक्षा आहे ती अनिल पाटील यांच्याकडून अमळनेर तालुक्यातीलच पाडळसरे धरणाचे बरेच काम झाले आहे. आणखी मदत लाभल्यास हे काम पूर्णत्वास येईल यात शंका नाही.

माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन एक अपेक्षा व्यक्त केली. ती म्हणजे जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खान्देशासाठी स्वतंत्र तापी पाटबंधारे महामंडळ स्थापन झाले आहे. या मंडळाच्या माध्यमातून सिंचन विकासाच्या अनेक योजनांचे प्रस्ताव झाले ते प्रलंबित आहेत. सिंचनाचा अनुशेष या जिल्ह्यात नाही असे सांगितले जाते मात्र जिल्ह्यातील मोठा भाग आजही अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जातो.  सिंचनाच्या या योजना पूर्ण होण्यासाठी जर सर्व एकत्र आले तर… निश्‍चितच लाभ होऊ शकतो. मंत्रीमंडळात नव्याने प्रवेश केलेले अनिल पाटील यांनी यासाठी नव्याने पुढाकार घेतल्यास व समन्वयाची भूमिका घेतल्यास हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. हा ‘एकच वादा’… त्यांचे राजकीय व जिल्ह्यातील जनतेचे भवितव्य उज्ज्वल करणारा ठरू शकतो…!