…अन् आता बिहारमध्येही! अल्पवयीन तरुणी, संगीत शिक्षकाला विवस्त्र करून बेदम मारहाण

अलीकडच्या काळात देशातील काही राज्यांमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत विवस्त्र करून, मारहाण किंवा छेडछाड केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मणिपूर, पश्चिम बंगाल आणि आता बिहारमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत. दुसरीकडे, राजस्थानबाबत सांगितले जाते की, तेथे महिलांवर सर्वाधिक गुन्हे घडले आहेत.

दरम्यान, बिहार राज्यातील बेगुसराय जिल्ह्यात 3 जणांनी आक्षेपार्ह अवस्थेत एका जोडप्याला विवस्त्र अवस्थेत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कथित जोडप्याच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसणारा पीडित तरुणी अल्पवयीन आहे, तर पुरुषाचे वय 40 ते 50 वर्षांच्या दरम्यान आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की काही लोकांनी या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते, त्यानंतर त्यांना सार्वजनिकरित्या विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी त्या व्यक्तीला केली अटक
बेगुसराय जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक योगेंद्र कुमार सांगतात की, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आधी एक अल्पवयीन मुलगी आणि एका मध्यमवयीन व्यक्तीची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या वक्तव्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा व्यवसायाने संगीत शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध
अल्पवयीन आणि आरोपींना मारहाण करणाऱ्या तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गेल्या गुरुवारचे आहे. पोलिस अधीक्षक योगेंद्र कुमार म्हणाले – पोलिस व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. घटनास्थळावरून जप्त केलेले कपडे आणि सामान फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

तपासासाठी तयार केले पथक
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर पीडितेची वैद्यकीय तपासणीही केली जात आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाबही नोंदवला जाणार आहे.