नागपूर : बुधवारी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना चांगलेच घेरले. जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नांच्या मुद्यावर ते बोलत होते.
विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही त्यामुळे एवढं लिमिटेड न राहता एक महिना अधिवेशन घ्यावं असे आम्ही म्हटले होते असे जयंत पाटील म्हणाले. यावर बोलण्यासाठी अजित पवार उठू लागल्यावर आधी कोणी बोलायचं हे बसून ठरवा, असे जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर “बसून ठरवायचं काही कारण नाही. आमचं अंडरस्टँडींग खुप चांगलं आहे. कसं कुणी बोलायचं ते आम्हाला कळतं,” असे उत्तर अजित पवारांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, “काल कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी होता. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. त्यावेळी विरोधी पक्षाला कळलं होतं की, अधिवेशन संपणार आहे. त्यांनी अध्यक्षांना सांगायला हवं होतं की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. इकडे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा,” असा टोलाही त्यांनी लगावला.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “म्हातारी मेल्याचं दु:ख आहेच पण म्हातारी मेल्याच्या दु:खापेक्षा काळ सोकावतो याचं दु:ख अधिक आहे. विरोधी पक्षाला विदर्भातच येऊन विदर्भाचा विसरच पडावा याचं दु:ख अधिक आहे. पण काही हरकत नाही आम्ही विदर्भाला विसरणार नाही,” असे ते म्हणाले.