अन् ठेवीदाराला मिळाला न्याय

भुसावळ : शहरातील जय माता दी पतसंस्थेत मुदत ठेव ठेवूनही रक्कम परत करण्यात न आल्याने ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली होती. या प्रकरणी नुकताच निकाल लागला असून पतसंस्थेने ग्राहकाला रक्कम व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत.

व्याजासह रक्कम देण्याचे आदेश
मुक्ताईनगरातील ठेवीदार मधुकर लक्ष्मण सोनार यांनी शहरातील जय माता दी अर्बन को ऑप क्रेडीट संस्थेत गुंतवणूक केली होती व 13 लाख 16 हजार 588 रुपये व्याजासह घेणे असल्यानंतरही वारंवार मागणी करूनही रक्कम न मिळाल्याने जिल्हा ग्राहक मंचात ऑक्टोबर 2022 मध्ये दावा दाखल करण्यात आला होता. तीन महिन्यात या दाव्यावर सुनावणी होवून ठेवीदाराच्या एकूण 28 पावतींच्या ठेव रकमेवर रक्कम अदा होईपर्यंत नऊ टक्के व्याज तक्रारदाराला देण्यात यावे तसेच मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी 10 हजार व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक आयोगाच्या प्रभारी अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांनी दिले. तक्रारदारातर्फे अ‍ॅड.राजेश उपाध्याय यांनी काम पाहिले.