जळगाव : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे पाच महिन्याच्या चिमुकल्यासह विवाहितेने विहिरीत आत्महत्या केली. लजीना बी आरीफ शेख (22, लासगाव, ता.पाचोरा) व असद शेख (पाच महिने) अशी मयतांची नावे असून, अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. ही घटना आज मंगळवार, 30 मे रोजी उघडकीस आली. या घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील आरीफ शेख यांचा विवाह गावातीलच त्यांच्या मामाची मुलगी लजीनाबी यांच्याशी झाल्. या दाम्पत्यांना पुत्ररत्न प्राप्त होवुन त्याचे नाव असद ठेवण्यात आले. बोलता बोलता असद पाच महिन्याचा झाला. दरम्यान २८ मे २०२३ रोजी गावात समाज बांधवातील लग्न असल्याने आरिफ शेख यांच्या परिवारास आमंत्रित करण्यात आले होते.
आरिफ शेख हे परिवारासह लग्नात सहभागी होण्यासाठी गेले. मात्र लजिनाबी यांनी सांगितले की, असद व मी थोड्यावेळात येतो. आरिफ शेख व त्यांचे आई, वडील लग्न समारंभात निघुन गेले. मात्र खुप वेळ होवुनही लजिनाबी ह्या लग्नात पोहचल्या नाही. यावेळी आरिफ शेख यांनी घर गाठले असता लजिनाबी व असद हे घरी नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी लजिनाबी व असद यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळुन आले नाही. शेवटी हताश होऊन आरिफ शेख यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये दि.२९ मे रोजी सकाळी लजिनाबी व असद यांची मिसिंग दाखल करण्यात आली होती .
दरम्यान मंगळवारी ३० मे रोजी गावातील बापू रामदास पाटील यांच्या शेत शिवारातील विहीरीत लजिनाबी व असद यांचा मृतदेह सकाळी ९ वाजेच्या दरम्यान शेतात कामासाठी आलेल्या मजुरांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे व पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघमोडे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून लजिनाबी आरिफ शेख व असद आरिफ शेख यांचे मृतदेह रुग्णवाहिका तुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले असून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात ५४ व ५५ अशा दोन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दिलीप वाघमोडे,पोलीस नाईक विकास खैरे सामनेर बीट करीत आहे.