पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. हे दोन्ही नेते आल्याने या पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांची मंचावर भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. यावेळी दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलं नसलं तरी उपस्थितांच्या चेहऱ्यावरील हास्य लपून राहिलं नव्हतं. शिवाय पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप दिल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे.