स्वप्न पाहियले, गाठावे आभाळ । जानियला काळ तो एक ज्ञाना।, एकदा वाचाच ही कहाणी

(चिंतामण पाटील)
अमळनेर-मारवाड रस्त्यावर प्रताप महाविद्यालया समोरचारचाकी वाहनावर एक तरुण झेरॉक्स काढून देत होता थांबून त्याची विचारपूस केली. तो अमळनेर तालुक्यातील कंडारी येथील ज्ञानेश्वर तुकाराम पाटील होता. ही डिजिटल मोबाईल गाडीची शक्कल तू कशी काय लढवली ? ह्या प्रश्नावर त्याने बेरोजगारीच्या ठेचांनी अक्कल आली आणि हे रोजगाराचे साधन मिळाले असे उत्तर दिले. त्यानंतर त्याच्याशी केलेली बातचीत त्याच्याच शब्दात. “शिक्षकच व्हायचं म्हणून बीए डीएड केलं, संगणकीय प्रशिक्षणही घेतलं. पण, अव्वाच्या सव्वा डोनेशन देण्याची ऐपत एक एकर शेती असलेल्या व दोन्ही पायांनी अधू असलेल्या अपंगबापाची नव्हती.

घेतले त्याशिक्षणाचा मात्र फायदा झाला आणि ग्राम पंचायतीत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम मिळाले, लग्नही झाले. आता फिकीर नाही असे दिसत असतानाच ३ हजार लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतीलाच ऑपरेटर नेमण्याचा जीआर आला. त्यामुळे माझी नोकरी गेली, आणि पुन्हा रोजगारासाठी पायपीट सुरू झाली जळगाव आणि धुळे एमआयडीसी पालथ्या घातल्या. कुठे No vaconcy च्या पाटीकडे बोट दाखविले तर कुठे ५-६ हजारपगार सांगितला. घर, गाव सोडून तुटपुंज्या पगारावर भागणार नव्हते म्हणून नोकरीचा शोध सुरू ठेवला. हा शोध सगुणा पोल्ट्री कंपनीच्या सुपरवायझर पदावर येऊन थांबला. पगार चांगला होता.

सगुणातल्या सुपरवायझरचा आनंदात भर पडली मी व्यवस्थापक झालो. पण, सतत प्रवास त्रासदायक वाटू लागला व आपल्या कौशल्याचा उपयोग होत नाही, कामात आनंद नाही म्हणून ८ वर्षांनी ती नोकरी सुद्धा सोडली. कॉम्प्युटर ऑपरेटरच्या कामाचा असलेल्या अनुभवाचा आता उपयोग करावा असा निर्धार करून अमळनेर तहसील परिसरात भाड्याची जागा शोधू लागलो. त्यात ३ महिने गेले दीड दोन लाख अनामत आणि न परवडणारे भाडे ऐकून दुकानाचा शोध थांबवला. त्याचवेळी फेसबुकवर फिरत्या कापड विक्रीच्या मोबाईल गाडीची जाहिरात वाचली. विक्रेता नंदुरबारचा होता. गाडी छान होती आणि कोणतेही बदल न करता मला ती वापरता येणार होती. या गाडीत छोटा प्रिंटर, झेरॉक्स म शीन, लॅपटॉप सहज ठेवता आल्याने लगेच कामाला सुरुवात केली.

ही सर्व यंत्रणा इन्व्हर्टरवर चालणारी असल्याने वीज कनेक्शनची गरज भासली नाही. सुरुवात तहसील परिसरातच केली. संगणकीय कामे करणारी अनेक दुकाने या भागात असल्याने फार काही काम मिळेना अशातच प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी पुल ओलांडून पायपीट करीत दूरवर जावे लागते. म्हणून तुझी गाडी महाविद्यालया समोर लाव असा सत्ता एका व्यक्तीने दिला. तो टर्निंग पॉइंट ठरला. १ जून २०२३ पासून गाडी इये लावू लागलो. आता खर्च वजाजाता दररोज बाराशे ते पंधराशे रुपये कमावतो.

झेरॉक्स, डीटीपी, हॉल तिकीट, ऑनलाईन कामे, ऑनलाईन पेमेंट, व या भागातील शेतकऱ्यांची कामे करून देतो. बहुतांश विद्यार्थीग्राहक असत्याने त्यांच्याकडे पैशांची अडचण असल्यास मी समजून घेतो. लगेच पैशांचा आग्रह धरत नाही. आधार कार्ड काढण्याची, व तहसील संबंधित महाऑनलाईन ची परवानगी मिळाली तर अजून कामे वाढतील व मी इतरांना सुद्धा रोजगार देऊ शकतो. कमी वयात अनेक टक्के टोणपे खायला मिळाले. दोन वेळा ग्रामपंचायत निवडणूक लढलो आणि पराभूत झालो. यातून भरपूर शिकायला मिळाले. आजही लोकांसाठी काम करायला आवडते. पण सध्या याच कामावर लक्ष केंद्रित केले आहे.”

डिजिटल मोबाईल गाडीची ही शक्कल ज्ञानेश्वरला रोजगार देणारी ठरली आहे. त्याच्यासाठी मला
कवितेच्या पुढील ओळी सुचल्या. 

ठेचाळता पाय, म्हणते तिडीक ।
धडा मिळे एक बहुमोल ।। 

स्वप्न पाहियले, गाठावे आभाळ । जानियला काळ तो एक ज्ञाना ।।