तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे महामार्गावर एका हॉटेलमध्ये कंटेनर घुसून झालेल्या अपघातात 10 जण ठार तर 28जण जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वाढते अपघात हा विषय चर्चेला आला आहे. त्यापूर्वीची घटना म्हणजे देशभर गाजणार्या समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजीक विदर्भ ट्रॅव्हल्सची बस रस्त्यातील दुभाजकावर आदळून तीने पेट घेतला. या अपघातात बस मध्ये शांतपणे झोपलेले 25 जण जळून खाक झाले. गंमत म्हणजे ही बस जळाली त्याच्या दुसर्या दिवशी तिच्या प्रदुषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतरही लागोपाठ समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे आणि त्यापूर्वीही असे प्रकार सतत होत आहेत. या वारंवार घडणार्या अपघातांच्या घटना संपूर्ण देशभरातील महामार्गाच्या जाळ्यावरील अपघात आणि त्यात होणारे मृत्यू याबाबत नव्याने चर्चा घडवून आणणे क्रमप्राप्त झाले आहे. कोरोनासारखे विविध आजार व अन्य घटनांच्या तुलनेत अपघात घडून मृत्यू होण्याचे प्रमाण हे जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.
दळणवळण सुलभ व्हावे, वेळेची व इंधनाची बचत व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने पुढाकार घेऊन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात महामार्गाचे जाळे वाढविले आहे. आणि त्याचे दृश्य परिणामही दिसू लागले आहेत. समृध्दी मार्गाचा विचार करता ही मोठी उपलब्धी ठरली आहे. पण याच मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याचा अर्थ तयार झालेल्या या रस्त्यांना दोष द्यायचा काय? अपघातांना झालेलेे चांगले रस्ते जबाबदार आहेत काय? याप्रश्नी राजकारणी लोकांचे विचार ऐकता त्यांच्या दृष्टीकोणातून टिका करण्यापर्यंत ठिक आहे. रस्ते अपघातात कुणाचा जीव जाणे याचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करूही नये. वास्तविक या विषयात राजकारण आणणेही निषेधार्ह आहे, पण आपल्याकडे कोणत्या घटनेचा इश्यू करायचा याचे बंधन नाही. घडणार्या घटनांचे अवलोकन करता बर्याच अपघातांना मानवी चुका कारण ठरल्या आहेत. मात्र वाईटपणा नको म्हणून सारेच रस्त्यांना दोष देऊन मोकळे होतात. रस्त्यांवर धावणारी वाहने सदोष आहेत काय? आणि नसतील तर परिवहन विभागाची यंत्रणा त्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी देतेच कसे. महामार्गावरून जाता-येता अनेक वाहतूक पोलीस दिसतात. महामार्ग पोलीसांचे थवेच्या थवे बर्याच वेळेस दिसतात. ते अडवितात कुणाला तर मालवाहतूक करणार्या वाहनांना. प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांनी अडविली व तपासणी केली असे दृश्य फार कमी पहायला मिळते. यामागे नेमके कारण काय हे सर्वांना ठाऊक आहे. रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतूक करणार्या खासगी बसेस काही तास जेवणासाठी, काही वेळ चहापाण्यासाठी थांबत असतात. आणि ही वेळ भरून काढण्यासाठी मग बसेस 120 पेक्षा जास्त गतीने पळवितात. या गतीने एखादी बस असेल आणि तिचा अपघात झाला तर त्या बसची व आतील लोकांची अवस्था काय होणार? याचा विचार कोणी करणार नाही काय? मागे एक आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. महामार्गावरील अपघाताची त्यात माहिती देण्यात आली होती. यात गत अडीच वर्षात राज्यात एकूण 74 हजार 289 अपघात झाले. त्यात 35 हजार 732 लोकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय या अपघातांमध्ये 25 हजार 4 जणांना दुखापती झाल्या किंवा कायमचे अपंगत्व आले. या अपघाताच्या एकूण 65 हजार, 465 केसेस पोलिसात दाखल आहेत. अपघातांच्या या घटनांमुळे असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि रोज होत असतात. ज्या कुटुंबावर यामुळे आघात होतो त्यांची अवस्था किती भयंकर असते हे आपण डोळ्याने बघतो. बर्याच वेळेस तर मन सुन्न करणारा प्रकार समोर दिसतो तो म्हणजे अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करणे दूर पण त्या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्यांची संख्या मोठी असते. मोबाईलवर शुभ सकाळचे संदेश देतांना आपण एकमेकांना मदतीचे, सहकार्याचे डोस पाजतो पण अशा प्रसंगी अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे सहसा कोणी धजावत नाही. किती हा अमानवी प्रकार… क्रूरता आणि भावना शून्य प्रकार. मात्र असे दृश्य डोळ्यांना नेहमीच दिसत असते. यानंतर सुरू होते ते रस्त्यांना दोष देणे… पूर्वी रस्त्यावरील खडड्यांमुळे अपघात होत तर आता रस्ते चांगले झाले म्हणून अपघात होत असतात. मग आता सांगा दोष कुणाला द्यायचा…! अनेक ठिकाणी कारवार्ई करणे आवश्यक असताना परिवहन यंत्रणा दुर्लक्ष करते.. हातात स्टेअरिंग असलेल्यांना वाहनाच्या परिस्थितीची कल्पना असताना वेग मर्यादेचे भान नसते… मग दोष तो कुणाचा? जास्त जीव घेणार्या महामार्गांवरील अपघातांबाबत आता एकूणच नव्याने संशोधन करून शासनानेच पुढाकार घेऊन नवे धोरण ठरवायची गरज नव्याने निर्माण झाली आहे.