अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात एक विमान कोसळले आहे. अफगाण मीडियाने सांगितले की, हे भारतीय विमान असून ते मॉस्कोला जात होते. मात्र, हे विमान भारताचे नसल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. काल रात्री अफगाणिस्तानात कोसळलेले विमान भारतीय नसल्याचे नागरी उड्डयन मंत्रालयाचे म्हणणे आहे. हे भारतीय विमान नसल्याची पुष्टी डीजीसीएच्या अधिकाऱ्याने केली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बदखशान प्रांतातील पर्वतांमध्ये कोसळलेले विमान रशियाचे होते.
मंत्रालयाने ट्विट केले आहे की, अफगाणिस्तानमध्ये नुकताच झालेला दुर्दैवी विमान अपघात हे भारतीय विमान नाही. हे विमान रशियामध्ये नोंदणीकृत होते. दिल्लीहून मॉस्कोला गेलेले भारताचे विमान आज मॉस्कोमध्ये उतरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 6 जण होते, त्यापैकी 6 प्रवासी होते.
रशियन विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी संध्याकाळी एक रशियन विमान अफगाणिस्तानच्या रडारवरून गायब झाले. विमानात 6 जण होते. हे विमान फ्रान्सचे डसॉल्ट फाल्कन 10 जेट होते. हे चार्टर विमान होते जे भारतातून उझबेकिस्तानमार्गे मॉस्कोला जात होते.
या घटनेची माहिती देताना, तालिबानचे बदख्शानमधील माहिती आणि संस्कृती प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, विमान जेबक जिल्ह्यातील तोफखाना परिसरात कोसळले. अधिका-यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी करण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.