मुंबई : अहमदनगरमध्ये संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापू लागलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही परखड व रोकठोक भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊ नका. अफझल खान असेल किंवा औरंगजेब असेल या लोकांचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. कोणीही त्यांचं समर्थन करणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल, समाजात एकमेंकांबद्दल अढी निर्णाण करण्याचं किंवा तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे सहन केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही, असेही फडणवीस म्हणाले.