अमळनेर शहरातील कुविख्यात गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

अमळनेर : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या गुन्हे प्रवृत्तीविरोधात जिल्हा पोलीस दलाने मोहिम उघडली असून यापूर्वी शहरातील दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए झाल्यानंतर तब्बल 13 गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात विशाल विजय सोनवणे (27, फरशी रोड, अमळनेर) याच्यावर एमपीडीए कारवाईबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेश काढल्यानंतर त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, सातत्याने सुरू असलेल्या कारवाईमुळे अमळनेरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तिसरा गुन्हेगार स्थानबद्ध
विशाल सोनवणे या संशयीताविरोधात तीन खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत, गर्दी, चोरी, हद्दपार आदेशाचे उल्लंघण आदी एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. संशयीताला स्थालबद्ध करण्याबाबत पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याच्यावर पडताळणी होवून तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला. अमन मित्तल यांनी मंगळवारी सायंकाळी स्थानबद्धतेचे आदेश काढल्यानंतर बुधवारी त्यास ताब्यात घेत नागपूर कारागृहात हलवण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, अमळनेर निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक ए.आर.भुसारे, गुन्हे शाखेचे युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, अमळनेरचे किशोर पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, हितेश चिंचोरे, सागर साळुंखे, नरेश बडगुजर, निलेश मोरे आदींच्या पथकाने केली.