Amol Mitkari car attack : राष्ट्रवादी काँग्रेस ‘अजित पवार गटा’चे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर हा प्रकार घडला. संबंधित तरुण हे मनसे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, असे मागून हल्ले करुन काही होणार नाही, ते नपूसंक लोक आहेत. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना लक्ष्य केले होते. पुण्यातील मुसळधार पावसाचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरे यांनी खोचक टिप्पणी केली होती. अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली, असे राज ठाकरे यांनी भेटले होते. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर तिखट भाषेत टीका केली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख थेट सुपारीबाज असा केला होता. त्यांच्या या टीकेचा राग मनात धरुन मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात आले होते. ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.