धडगाव : प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेसाठी धावलघाट परिसरातील चिचलाबारी तालुका धडगांव येथे पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले. परंतु, या केंद्राची दुरवस्था झाल्यामुळे प्रवासी व वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
शहादा ते धडगांव रस्त्यावरील घाट परिसरात रात्री-अपरात्री, दिवसाही लुटमार, अपघात व अन्य अनुचित घटना घडतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी व वाहनधारकांच्या मदतीसाठी पोलीस चौकी बांधण्यात आली. तसेच म्हसावद व धडगांव पोलीसांकडून नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
शिवाय या घाट परिसरात कार्यरत पोलीसांना देखील ही चौकी आधारभूत ठरते. परंतु, या चौकीच्या खिडक्या, दरवाजे, छताचे पत्रे मागील सात वर्षांपासून गायब झाले आहे. अन्य चोरीसाठी येणाऱ्या चोरांनी पोलीस चौकीवरच डल्ला मारल्याने सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिक व वाहनधकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा या पोलीस चौकीची दुरुस्तीसाठी काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.