अरेच्चा! एक कोटींची लाच; पण अडकला एसीबींच्या जाळ्यात

एक कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर एमआयडीसीतील सहायक अभियंत्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. एसीबीने अटक केलेल्या संशयिताचे नाव अमित किशोर गायकवाड असे आहे. तर धुळे एमआयडीसीतला कार्यकारी अभियंता गणेश वाघ (तत्कालीन नेमणूक अहमदनगर एमआयडीसी) हा फरार आहे.

दरम्यान, नाशिक एसीबीने तब्बल एक कोटी रुपयांची लाचखोरी उघड केल्याची माहिती विभागाचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी त्यांनी एसीबीच्या नाशिक पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतली. त्यावेळी नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांसह पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, अंमलदार प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण उपस्थित होते.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील एका व्यक्तिने अहमदनगरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) एक हजार एमएम व्यासाची लोखंडी पाइपलाइन बदलण्याचे कंत्राट घेतले होते. मंजूर निविदेनुसार ३१ कोटी ५७ लाख अकरा हजार ९९५ रुपये रकमेवर पाच टक्क्यांप्रमाणे दीड कोटी रुपये अनामत रक्कम होती. तर सुरक्षा ठेव म्हणून ९४ लाख रुपये एमआयडीसीकडे जमा होते.

काम पूर्ण झाल्यावर अंतिम देयकानुसार २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रुपये ठेकेदाराला परत मिळणे अपेक्षित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली. बरीच तडजोड केल्यानंतरही संशयित गायकवाडने लाचेची रक्कम कमी केली नाही. त्यानंतर शुक्रवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नाशिक पथकाने अहमदनगरात गायकवाडला ताब्यात घेतले.