जळगाव । एकीकडे रब्बी हंगाम काढण्याची वेळ असताना राज्यावर अवकाळी पावसाचं अस्मानी संकट आले. हवामान खात्याने आजपासून तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. सोमवार २६ आणि मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
इतकंच नाही, तर काही जिल्ह्यांना सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसणार, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. ऐन रबी हंगामाची पिके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट आल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
जळगावात कशी राहणार स्थिती?
उत्तर व पश्चिम भारतात होत असलेल्या नियमित हवामानातील बदलामुळे पश्चिमी विक्षोभाची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून, सकाळी थंडी तर दुपारी कडक उन्हें नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. रविवारी पहाटे जळगाव जिल्ह्याचा पारा १२ अंशांवर घसरला. शुक्रवारी तो १४ अंशांवर होता. दुसरीकडे आज सोमवारी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही भागात दुपार ते सायंकाळपर्यंत बेमोसमी पावसाची शक्यता आहे.