तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। अमेरिकेच्या अर्थशास्त्रज्ञ प्रा. क्लाऊडिया गोल्डिन यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार आहे. श्रमिकांच्या बाजारपेठेत महिला कामगारांना पुरुषांच्या तुलनेत मिळणाऱ्या वेतनाचा महत्त्वपूर्ण अभ्यास केल्याबद्दल त्यांना हे नोबेल जाहीर झाले आहे. श्रमिकांच्या बाजारपेठेत महिलांची भूमिका समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि यासाठी गोल्डिन यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. गोल्डिन यांनी मागील २०० वर्षांतील कामाच्या ठिकाणी महिलांच्या योगदानाचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाचा अभ्यास करून याबाबतची आकडेवारी जगासमोर आणली आहे. या दोन शतकाच्या कालखंडात महिला उच्चशिक्षणात पुरुषांपेक्षा अग्रेसर असूनही त्यांना मिळणाऱ्या वेतनात फारसा फरक पडलेला नाही, असा महत्त्वाचा निष्कर्ष आकडेवारीवरून निघाल्याचे गोल्डिन यांनी सांगितले आहे. गोल्डिन यांनी त्यांच्या संशोधनातून कोणताही तोडगा दिलेला नसला, तरी हे संशोधन भविष्यात धोरणकर्त्यांना आवश्यक ते बदल करण्यास प्रवृत्त करेल, असा विश्वास पुरस्काराची घोषणा करताना नोबेल समितीने व्यक्त केला आहे.
समस्येच्या निराकरणासाठी धोरण आखले जाते. पण, ती समस्या समजलीच नसेल तर धोरण आखणे कठीण जाते. गोल्डिन यांच्या संशोधनाने नेमकी समस्या लक्षात आणून दिली आहे. त्यामुळे आता धोरण आखताना अधिक नेमकेपणाने धोरण आखण्यास मदत होईल, असे नोबेल समितीच्या सदस्या रॅन्डी हजलमार्सन यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले. प्रा. गोल्डिन यांचा जन्म न्यू यॉर्क शहरात १९४६ मध्ये झाला. १९९० मध्ये त्या हार्वर्डच्या अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. १९९९-२००० मध्ये इकॉनॉमिक हिस्ट्री असोसिएशनचे आणि २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. त्यांनी सुरुवातीला पुरातत्त्व शास्त्रज्ञ बनण्याचा निश्चय केला होता. माध्यमिक शाळेत असताना ‘द मायक्रोब हंटर्स’ हे पुस्तक वाचल्यानंतर त्या बॅक्टेरियोलॉजीकडे आकर्षित झाल्या. पुढे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी.ए. केल्यानंतर १९७२ मध्ये शिकागो विद्यापीठातून औद्योगिक संघटना आणि कामगार अर्थशास्त्र या विषयात पीएचडी प्राप्त केली. अनेक नामवंत संस्थानशी त्या जुळल्या आणि त्यांच्यासाठी त्यांनी कार्य केले.
प्रा. गोल्डिन महिला आणि अर्थव्यवस्थेवरील त्यांच्या ऐतिहासिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शोधनिबंधांमध्ये महिलांचे करीअर, उच्च शिक्षणातील सहभाग, लग्नानंतरची महिलांची स्थिती याचा त्यांनी सखोल आढावा घेतला आहे. प्रा. गोल्डिन यांनी महिला कामगार शक्तीच्या आर्थिक इतिहासावर पुस्तक लिहिल्यानंतर यूएस शिक्षणाच्या इतिहासाचे संशोधन करण्यास सुरुवात केली. अमेरिकेतील आर्थिक विषमतेचा इतिहास आणि त्याचा शैक्षणिक प्रगतीशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक शोधनिबंध तयार केले. ते वेगवेगळ्या ठिकाणी मांडून चर्चा घडवून आणली. त्यांचा हा प्रवास अखंड सुरू राहिला. त्यांच्या या अभ्यासाची दखल घेण्यात आली. प्रा. गोल्डिन यांचे हे संशोधन एका देशापुरते मर्यादित नसून जागतिक पातळीवर उपयोगात येणारे आहे. महिलांना मिळणाऱ्या वेतनाच्या बाबतीत जी स्थिती अमेरिकेत आहे, ती कमी-अधिक प्रमाणात भारतात व अन्य देशातही आहे. भारतात निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करीत असल्या, तरी प्रा. गोल्डिन यांच्या संशोधनातून जे समोर आले आहे, तेच वास्तव भारतात आहे.
महिलांच्या क्षमतेचा योग्य अभ्यास करून त्यांना पुरुषांच्या बरोबरीने आणल्यास भारताला त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो. केंद्रातील मोदी सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. राजकारणात महिलांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी नुकतेच महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले. याच पद्धतीने अन्य क्षेत्रातही महिलांचे योगदान वाढवताना त्यांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन देण्याची हमी दिल्यास मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो. महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास आणि आहे त्या क्षेत्रात अधिक चांगले काम करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळू शकते. दूरदृष्टी ठेवून या संशोधनाकडे पाहण्याची गरज आहे. अर्थशास्त्रात काम करणारे भारतीय अभ्यासक प्रा. गोल्डिन यांच्या संशोधनाचा अभ्यास करतील, अशी अपेक्षा आहे. प्रा. क्लाऊडिया गोल्डिन यांनी मिळविलेले अर्थशास्त्राचे नोबेल एका अर्थाने महिलांना बळ देणारे आहे. महिलांनीसुद्धा हा विषय गंभीरतेने अभ्यासून पुढील वाटचाल करावी.