अर्धे जग आमचेच

– अमोल पुसदकर
11 जुलै हा population जागतिक लोकसंख्या दिवस आहे. जगामध्ये वाढणार्‍या लोकसंख्येमुळे निसर्गावर, पर्यावरणावर सृष्टीमध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांवर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे, लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करणे असा या लोकसंख्या दिवसाचा एक उद्देश आहे. जगामध्ये जर आपण लोकसंख्येची विभागणी केली तर त्यामध्ये प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष असे दोन घटक येतात. म्हणजे ज्या स्त्रियांना अनादी काळापासून सातत्याने कुठल्या ना कुठल्या बंधनात ठेवलं गेलं व त्यामुळे विविध क्षेत्रात समोर जाण्याच्या संधी त्यांना मिळाल्या नाहीत. त्यांचा शारीरिक, मानसिक असा अनेक प्रकारचा विकास त्यामुळे माघारला ते दिवस आता संपत आलेले आहे. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येकडे सकारात्मक दृष्टीने बघितले तर अर्धी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. म्हणजे अर्धे जग हे स्त्रियांचे आहे. ज्यांच्या हातामध्ये अर्धे जग आहे ती स्त्री कमजोर कशी असू शकेल? नवनिर्मितीची क्षमता निसर्गाने स्त्रियांना प्रदान केलेली आहे. स्त्री ही मुळातच सक्षम आहे. घरामध्ये, कुटुंबामध्ये निर्माण होणार्‍या अनेक अडीअडचणी, अनेक प्रश्न यांना धीराने न कंटाळता न खचता सामोरे जाणारी स्त्रीच आहे.

अनेक वेळा जोडीदाराचे निधन झालेले असते. पदरी मुले असतात. अनेक सखे सोयरे, आप्तस्वकीयांनी साथ सोडलेली असते. अशाही परिस्थितीमध्ये खचून न जाता आपल्या मुलांकडे, मुलींकडे पाहून, त्यांच्या भविष्याचा विचार करून, त्यांना उभे करण्यासाठी स्त्री उभी राहते. जर ती अशिक्षित असेल किंवा फार शिकलेली नसेल तर ती चार घरची कामे करून आपल्या मुलांना मोठं करण्याची जिद्द बाळगते. जर ती शिकली सवरली असेल तर नोकरी, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला पुढे आणते. त्यामुळे स्त्री ही मुळातच सक्षम आहे असे म्हटले पाहिजे. स्त्रीचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे सहनशीलता. अनेकानेक प्रकारचे शारीरिक, मानसिक आघात तिच्यावर होत असतात. या सर्व आघातांना सहन करून ती आपला कर्तव्यमार्ग सोडत नाही. जीवनाच्या अनेकानेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी फार मोठे यश मिळविलेले आहे. एक काळ असा होता ज्या काळामध्ये मुलगी झाली तर लोक उसासे टाकायचे, त्यांना वाईट वाटायचे. पाठोपाठ मुली झाल्या तर त्या मात्र विचारूच नका. परंतु आज अनेक घरांमध्ये ज्यांना दोन्ही मुली आहेत किंवा तीन मुली आहे या तीनही मुलींनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळेच अनेक पालक सुद्धा केवळ एक मुलगी असूनही तिचा अभिमान बाळगतात आणि ती मुलगी सुद्धा आपल्या पालकांचे मस्तक गर्वाने, अभिमानाने उंच होईल अशा पद्धतीचे कार्य करते. हा संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. तसाच ती समाजजीवनाचा आधार सुद्धा आहे. पूर्वी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांपैकी काही ठिकाणी स्त्रियांनी त्यात शिरकाव केला, काही ठिकाणी त्यांनी प्रगती केली. काही ठिकाणी त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केलेली आहेत.

population : पूर्वी एक काळ असा होता ज्या काळामध्ये भारतीय सैन्यांमध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. नंतर काही काळाने त्यांना प्रवेश सुरू झाला. परंतु त्यांना अल्पावधीकरिता सैन्यामध्ये सामील केले जायचे. परंतु स्त्रियांची कर्तबगारी व त्यांनी सैन्यांमध्ये आपला उमटवलेला ठसा बघता त्यांच्यासाठी सैन्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी प्रदान करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता आपल्या देशांमध्ये स्त्रियांचा लढाऊ इतिहास सुद्धा आहे. राणी दुर्गावती, राणी अवंतीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर यांच्यापासून ते क्रांतिकारक प्रीतिलता वड्डेदार, दुर्गाभाभी, शांती घोष, सुनीती चौधरी या क्रांतिकारक महिलांपर्यंत व आझाद हिंद सेनेमध्ये महिलांचे नेतृत्व करणार्‍या कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन यांच्यापर्यंत महिलांचा लढाऊ वृत्तीचा सुद्धा इतिहास राहिलेला आहे. म्हणजे देशाला, समाजाला, कुटुंबाला ज्या पद्धतीच्या भूमिकेची आवश्यकता असते त्या पद्धतीची भूमिका स्त्री वठवू शकते, हे त्यांनी आजवरच्या इतिहासात दाखवून दिलेले आहे.

population लोकसंख्यावाढीकडे नेहमी नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. इतके लोक जन्माला येत आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी सर्वच गोष्टींची भविष्यात कमतरता होईल अशा पद्धतीचे निष्कर्ष काढले जातात. परंतु आपण हे विसरतो की याच लोकांमधून मोठमोठे राजकारण धुरंदर लोक निर्माण होतील. याच लोकसंख्येतून जगाचे नेतृत्व करणारे लोक निर्माण होतील. याच लोकसंख्येतून जगाला अन्न पुरविणारे कृषी शास्त्रज्ञ निर्माण होतील. याच लोकसंख्येतून लोकसंख्यावाढीच्या दुष्परिणामांना दूर करणारे, त्यांचे निवारण करणारे लोक निर्माण होतील. आज अर्धी जनसंख्या महिलांची आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले योगदान दिलेले आहे. आजही अनेक महिला या कष्टकरी आहेत, खेड्यापाड्यांमध्ये रोजंदारी, मजुरी करणार्‍या आहेत. अनेक महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. अनेक प्रकारच्या चालीरीती व बंधनांमध्ये त्या आहेत. येणार्‍या काळामध्ये अशा सर्व महिलांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता प्रदान करण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे. भारताचा विकास हा केवळ पुरुषांचा विकास नाही, भारताचा विकास हा केवळ महिलांचा विकास नाही. तर महिला व पुरुष हे दोन्ही समाजजीवनाच्या रथाची दोन चाकं आहेत. त्यामुळे भारताला जर प्रगत व्हायचे असेल तर आपल्या देशातील सर्वच महिलांना प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यांना त्यांचे कतृर्र्त्व दाखविण्याची संधी मिळाली पाहिजे. ही जबाबदारी समाजातील सर्व स्त्री-पुरुष यांच्यावर आहे. लोकसंख्या दिनानिमित्त अर्धे जग आमचे आहे. अर्ध्या जगाचा भार पेलणार्‍या, सोसणार्‍या आम्ही महिला आहोत ही गर्वाची अनुभूती आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे.

-9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)