अल्पवयीन कार चालक नागरिकांच्या जीवावर उठले; पुन्हा… धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुणे आणि परिसरात बड्या व्यक्तींच्या अल्पवयीन मुलाना गाड्या देणे नागरिकांच्या जीवावर उठले आहे. पोर्श प्रकरणानंतर आता पुन्हा एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आळंदी जवळील असणाऱ्या वडगाव घेणंद येथे समोर आला असून, धडकी भरवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जुन्या भांडणाचा राग धरुन अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. हा अल्पवयीन कार चालक त्या महिलेस चिरडण्यासाठी आधी कार पाठीमागे (रिव्हर्स) घेऊन जातो. त्यानंतर भरधाव वेगाने चालवत काही नागरिकांना आणि त्या महिलेस चिरडण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे.

दरम्यान, पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.