सुरत : सलुनमध्ये गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा तिथे काम करणाऱ्या शाहरुख शाहने विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. गुजरातमधील सुरत येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडितेने तक्रार केली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
रविवार, ५ नोव्हेंबर रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत जावेद हबीब सलूनमध्ये गेली होती. तिथे तिने तिचे केस कापल्यानंतर आपल्या आईकडे फेशियल करण्याचा हट्ट धरला. त्यानंतर शाहरुख शाह फेशियल करण्यासाठी तिला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला.
तिथे कोणीच नसल्याचे लक्षात घेत त्याने पीडित मुलीचा विनयभंग केला. मुलीने विरोध केला असता त्याने त्याला चुकून स्पर्श झाला असे म्हटले. परंतू, त्यानंतरही त्याचे हे कृत्य सुरुच राहिले. त्यानंतर पीडितेने बाहेर येत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.
पीडितेच्या कुटुंबियांनी सुरतमधील वेसू पोलीस ठाण्यात शाहरुखविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शाहरुख आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखचे खरे नाव रियाझ हसमतुल्ला खान असून तो उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे.