धरणगाव : शहरात एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न फसल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
शहरातील एका भागात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास क्लाससाठी गेली होती. मात्र, १० वाजेपर्यंत ती घरी न आल्यामुळे पालकांनी लागलीच बाहेरगावी राहणाऱ्या मुलीच्या काकांना ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ धरणगाव गाठत मुलीच्या मैत्रिणीकडे विचारपूस केली
तिने सांगितले की, त्या मुलीची बॅग गांधीमळा धरणगाव येथे पडली आहे. काही वेळानंतर त्यांची पुतणी रेल्वे स्टेशन जवळ रडत आहे. तेथे गेल्यावर काही महिला तिच्या आजूबाजूला उभ्या होत्या. यानंतर मुलीची विचारपूस केली असता तिने सांगितले की, आपण क्लासवरून घरी जात असताना गांधीमळा येथे दोघेजण तोंडाला रुमाल बांधून विनानंबरच्या दुचाकीवर आले व त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पाठीमागून तोंडाला रुमाल बांधून स्कूल बॅग फेकून बळजबरीने दुचाकीवर बसवले.
तेथून घेऊन जात असताना आपले काका पोलिस आहेत, असे सांगितल्यावर त्यांनी जळगाव रोडवर छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ गाडीच्या खाली उतरवून जोराचा धक्का दिल्याचे या मुलीने सांगितले. याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.