अवकाळीचा मान्सूनवर परिणाम होणार? हवामान खात्याकडून मोठी अपडेट

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणार्‍या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच वार्‍यांच्या बदलणार्‍या दिशा आणि पश्चिमी झंझावातामुळंही राज्यातील हवामानावर परिणाम होताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाचा मारा होत असल्यामुळं काही दिवसांनी मार्गस्थ होणार्‍या मान्सूनवर याचे काय परिणाम होणार याबाबतची सविस्तर माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे.

एप्रिल व मे महिन्यात पावसानं थैमान घातल्यामुळे पावसाळ्यात काय दिवस पाहावे लागणार अशी चिंता लागलेली आहे. अवकाळीमुळे मान्सूनचं आगमन लांबेल, अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर हवामान संस्था अल निनोच्या परिणामांसाठी तयार राहा असे इशारे देत असल्याने भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र अवकाळी पाऊस आणि मान्सून हे वेगवेगळे विषय असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यत आलं. भारतातील मान्सूनवर मात्र त्याचे परिणाम होणार नसल्यामुळं शेतकरी आणि नागरिकांना चिंता करू नये असं म्हणत हवामान खात्यानं दिलासा दिला आहे. यंदाच्या वर्षी ९६ टक्के म्हणजेच सर्वसाधारण प्रमाणात मान्सूनची हजेरी पाहायला मिळेल. अल निनोच्या प्रभावातही मान्सूनचं प्रमाण घटलं नसल्याचं निकीक्षण अधोरेखित करत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली.