धुळे : मालपूर परिसर हा कांदा उत्पादनाचे आगार आहे. येथे मोठ्या संख्येने शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात कांदा उत्पादन घेत असतात. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काही शेतकऱ्यांचे कांदा पीक मोठ्या प्रमाणावर करपले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाया जाणार असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. जिल्हा कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मालपूर येथील भटा पाटील, दिलीप धनगर, बापू पाटील, सुरेश बागुल, जगदीश खंडेराव, अशोक बागुल आदी शेतकऱ्यांचे कांदा रोपाचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. कांदा लागवडीसाठी सुमारे दोन महिने अगोदर बियाणे घेऊन रोप टाकावे लागते. या रोपाची चांगली निगा ठेवावी लागते.
लहान मुलाप्रमाणे शेतकरी काळजी घेऊन वाढीस लावतात. लागवडीयोग्य त्याची मजुरांच्या करतात. झाल्यानंतर साहाय्याने लागवड करतात मात्र, एन लागवड करण्याच्या आठवडाभरापूर्वी येथे अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांद्याची रोपे करपून गेली आहेत. परिणामी ही रोपे लागवडीयोग्य राहिली नसल्यामुळे, रब्बीतील कांदा लागवडीवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागणार आहे.
महागडे पाच किलो कांदा बियाणे आणले होते व दीड महिन्यांपूर्वी रोप टाकले होते. मात्र, या अवकाळी पावसाने रोप बसून गेले आहे. त्यामुळे आता हे पीक काही कामाचे नाही. कांदा लागवडीवर पाणी सोडावे लागले आहे. याची दखल घेऊन, शासनाने पंचनामा करावा, भटू रामचंद्र पाटील, शेतकरी