नंदूरबार : गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार बरसला. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नुकताच शहादा तालुक्यात दौरा केला. यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
शहादा तालुक्यातील हिंगणी, कोंडावळ, तोरखेडा, उभादगड, काकरदा आदी गावांना आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी भेट दिली. दरम्यान, लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानीची माहिती घ्यावी, भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही वेगाने पार पाडावी. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जावी, अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, डॉ. कांतीलाल टाटिया, प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, गाव पातळीवरील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.