मुंबई । फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढल्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. त्यातच राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला.
मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, अवकाळी पावसाचे संकट अजून कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आजही राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. पुढील 3 ते 4 दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कुठं कुठे कोसळणार पाऊस ..
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. याशिवाय सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे.