जळगाव : राज्यासह जिल्ह्यात वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळीचं संकट कायम असून जळगाव जिल्ह्यात आज शनिवारी देखील दुपारी ४ वाजेनंतर ३० ते ४० किमी वेगाने वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल जाणवत असून, गारपीट व पावसासोबतच जिल्ह्यात तापमानात वाढ होत असल्याचेही चित्र आहे. शुक्रवारी जळगावकरांना तीन प्रकारच्या वातावरणांचा अनुभव आला. सकाळी ६ वाजेदरम्यान पाऊस झाल्यानंतर, दुपारच्या वेळेस पारा ३७ अंशांवर पोहोचल्याने प्रचंड उकाडा तर सायंकाळी ३० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमळे जळगावकरांची धांदल उडाली.
जिल्ह्यात तापमानवाढीसह पावसाचेही वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी अनेक तालुक्यांमध्ये गारपीट व वादळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर मंगळवार ते गुरुवारपर्यंत काही काळ ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र, शुक्रवारी पुन्हा वातावरणात बदल झालेला होता. पाऊस, कडाक्याचे ऊन व सोसाट्याचा वारा असे तिहेरी वातावरण शुक्रवारी निर्माण झाले.
सायंकाळी जळगाव शहरासह अनेक तालुक्यांमध्ये वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे जळगाव तालुक्यातील केळीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे गहू, ज्वारी, मका पीक आडवे पडले. ऐन रब्बी हंगाम काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. दरम्यान,आज शनिवारीदेखील अशाच प्रकारचे वातावरण कायम राहणार असून, शनिवारी दुपारी ४ वाजेनंतर ३० ते ४० किमी वेगाने वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.