अवकाळीने बिघडवलं सातपुड्याचं आर्थिक गणित; आमचूरचा हंगाम महिनाभर लांबला, ३५ टक्के उत्पादनही घटले

मोलगी : औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आमचूरचे उत्पादन सातपुड्यातच अधिक होते. आमचूर हे सातपुड्याचे प्रमुख उत्पादन असल्याने ते या परिसरासाठी सोनंच. हे साेनंच सातपुड्याच्या अर्थकारणाला बळकटी मिळते. वर्षभराचे आर्थिक नियाेजन आमचूर उत्पन्नानुसारच केले जाते. परंतु, यंदा हे उत्पादन ४० टक्के घटले शिवाय महिनाभर हंगामही लांबला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडल्याचे म्हटले जात आहे.

चवदार स्वयंपाकासाठी वापरले जाणारे विविध उत्पादने व अनेक प्रकारची औषधी निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या आमचूरसाठी सातपुड्याची चौथी रांग प्रसिद्ध आहे. येथे त्याचे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जात असून यंदाही सर्वत्र आमचूरसाठीच धावपळ दिसून येत आहे. यासाठी मोलगी व धडगाव या दोनच बाजारपेठा उपलब्ध आहे. दोन महिन्यांपासून ते दोन्ही बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पावसाळा जसा जवळ येतोय तशा दोन्ही बाजारपेठा फुलू लागल्या. रोज हजारो क्विंटल आमचूर दाखल होत असून यातून कोट्यवधींची उलाढालही होत आहे.

सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या वर्षभराचे आर्थिक नियोजन ठरविणारे हे उत्पादन असल्याने आमचूरच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्यस्थितीत आमचूरला प्रतवारीनुसार ८० ते २५० रुपये प्रतिकिलो पर्यंतचा भाव मिळत आहे. यावर शेतकऱ्यांचे समाधान नसून ते चांगल्या किंमतीच्या प्रतिक्षेत आहे.

मोलगीतील सुगन लाहोटी, अशोक साखला, राजू साखला, कालू भन्साली, रविंद्र जैन, खएमचंद सोलंकी, भिला राजू भोई व महोन महाराज या व्यापाऱ्यांकडून सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

 मागील वर्षी आमचूरला १५० पासून ३२० रु. प्रतिकिलो भाव मिळला होता. यंदा यात पुन्हा वाढ होईल अशी अपेक्षा होती, परंतु किमती वाढण्याऐवजी २५ ते ३० टक्के कमी झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले शिवाय प्रतही खालावली परिणामी आमचे या वर्षाचे आर्थिक नियोजन प्रभावित झाले आहे.
– बिलाड्या पाडवी, आमचूर उत्पादक, कुंडल ता. धडगाव 

मागील वर्षी भारतातील सर्व मार्केटपैकी धडगाव व मोलगीचा मार्केटमध्येच सर्वाधिक आमचूर दाखल झाले, अन्य मार्केटमध्ये अपेक्षेनुसार मार्च दाखल होत नव्हता. कंपन्यांकडून मागणी वाढल्याने धडगाव व मोलगी या दोन मार्केटमध्ये आमचूरला चांगला भाव मिळाला होता. यंदा सर्व मार्केटमध्ये चांगला माल येत असल्याने भाव कमी झाले आहे.
– राजू सांखला, आमचूर व्यापारी, मोलगी ता. अक्कलकुवा