यावल । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी पुन्हा वाढताना दिसत असून यावल तालुक्यात पुन्हा एक खून झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून प्रौढाची हत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील रिधुरी येथे आहे. २४ तासात तालुक्यात दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
याबाबत असे की, रिधुरी गावात सोमवारी रात्री ८.३० वाजता घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे (वय ५०) यांच्या डोक्यात कुर्हाडीने वार करण्यात आले. यात धनराज सोनवणे जागीच ठार झाले. तर याच हाणामारीत सतीश सुखदेव सोनवणे (वय ३०), आरती सतीश सोनवणे (वय २८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या संदर्भात सोनी धनराज सोनवणे (वय ३५ रा. रिधुरी ) यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे व दीपक युवराज सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ हे करत आहेत.