जामनेर : अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी येथील माजी नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल हिरालाल बोहरा यांनी गौणखनिज, मुरूम उत्खनन करण्यासाठी तहसील कार्यालयातून तालुक्यातील लोंद्री शिवारातील परवानगी काढलेली होती. पंरतु त्यांनी त्या शिवारातून गौणखनिज न उचलता वाकी शिवारातील सोनबर्डी जवळून डंपर (एमएच १९, सीडब्ल्यू ७२२७) च्या सहाय्याने १ लाख २० हजार रुपयांचा २१५ ब्रास मुरूम वाहतूक करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी त्यांच्यासह ४ जणांना पोलिसांनी ८ रोजी ताब्यात घेतले आहे.
तलाठी नितीन प्रकाश मनोरे यांच्या फिर्यादीवरून जामनेर येथील अनिल हिरालाल बोहरा, अक्षय अनिल बोहरा, अमीर शौकत सैय्यद, मंजुरखान जलालखान यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ३७९, ३४ पर्यावरण संरक्षण कायदा व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करत आहेत.