मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या शिंदे गटातील एका नेत्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जातील, असा मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हा मोठा दावा केला आहे.
काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत ना ही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
अशोक चव्हाण भाजपात जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत. बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले, तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील. असं त्यांचं उलटं पालटं गणित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत साशंकता आहे. असं असलं तरी अशोक चव्हाण यांची मानसिकता झाली असावी. ते निश्चितपणे भाजपात प्रवेश करतील, असंही शिरसाटांनी नमूद केलं.