अहमदनगरच्या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा

A unique wedding ceremony: अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील स्मशानभूमीतील विवाह सोहळा राज्यभरात चर्चेत आला आहे. शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह करत असून इतरांसाठी अशुभ असणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी पोटापाण्याचा साधन झाली. याच ठिकाणी राहून आपल्या मुलीच शिक्षण पूर्ण केलं.

मयुरीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नासाठी वराची निवड करण्यात आली आणि लग्न थेट स्मशानभूमीतच लावण्याचा निर्णय गायकवाड दाम्पत्याने घेतला. सोहळा सुद्धा अगदी थाटामाटात पार पडला. मयुरी व मनोज यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकण्यात आला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

विशेष म्हणजे, स्मशानभूमी म्हंटल की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र राहाता शहरातील स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले असून या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत अंधश्रद्धेला फाटा दिला आहे.