अहमदाबादमधील बनावट खवा विक्रीचा डाव उधळलाः भुसावळात 12 लाखांचा खवा जप्त

भुसावळ : भुसावळात पोलिसांनी गुजरातमधून आलेला सुमारे साडेपाच टन बनावट खवा लक्झरीतून जप्त केला आहे. विशेष म्हणजे जळगावात या खव्याचा पुरवठा करण्यात आल्यानंतर त्याची भुसावळात डिलेवरी सुरू असताना कारवाई करण्यात आली तर येथून हा खवा विदर्भातील मलकापूरात पोहोच केला जाणार होता मात्र त्यापूर्वी कारवाई झाल्याने खळबळ उडाली.

दरम्यान, बनावट खव्याचे अहमदाबाद कनेक्शन समोर आले असून खवा वितरण करणारी एजंटाची मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय आहे. पोलिसांनीच आता पाळेमुळे खोदून संशयीतांना बेड्या ठोकण्याची अपेक्षा आहे.

आधी जळगावात नंतर भुसावळात वितरण : मलकापूरात जाणार होता खवा
पोलिसांनी याप्रकरणी लक्झरी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मात्र खवा तपासणीचा अहवाल आल्यानंतर अधिक काही सांगता येईल व नंतरच अधिक कारवाई करता येईल, अशी अंगकाढू भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, गुजरातमधील हा खवा हा जळगावातही उतरवण्यात आला व तेथून भुसावळसह मलकापूरमध्ये तो पोहोच केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गणेशोत्सवासह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच माव्याच्या मोदकांना मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बनावट खव्याचा वारेमाप करीत अखाद्य खवा ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सज्ज केले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता नाहाटा चौफुलीवर गुजरातमधून आलेल्या एम.के.ट्रॅव्हल्स (जी.जे.01 ए.टी.1210) मधून खवा उतरवून तो आयशर (जी.जे.38 टी.ए.1800) मध्ये टाकला जात असताना पथकाने छापेमारी केली. दोन्ही वाहनांवरील चालकांसह वाहने व खवा पोलीस उपअधीक्षक कार्यालयात आणण्यात आला व मोजणीत तब्बल 176 बॅगमध्ये पाच हजार 340 किलो वजनाचा खवा आढळला.

यांच्या पथकाने केली धाडसी कारवाई
या खव्याचे बाजारमूल्य 11 लाख 74 हजार 800 रुपये असल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले. ही कारवाई हवालदार सुरज पाटील, हवालदार संदीप चव्हाण, चालक सहाय्यक फौजदार अनल चौधरी, नाईक संकेत झांबरे यांच्या पथकाने केली. लक्झरी चालक कन्नू पटेल (37, अहमदाबाद) व आयशर चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (35, अहमदाबाद) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.